शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी पहावी लागणार जुलै महिन्याची वाट…
MH 28 News Live : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या यंदा प्रथमच ऑनलाइन पध्दतीने होणार आहेत. त्यासाठी नवे पोर्टल तयार केले जात आहे. मागील दीड-दोन महिन्यांत या पोर्टलचे काम ७० टक्क्यांपर्यंतच झाल्याने शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जुलै उजाडेल, अशी माहिती ग्रामविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
दरवर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होते. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन होत असल्याने त्यात पारदर्शकता नसल्याचा अनेकदा आरोप झाला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे शाळा बंद होत्या, त्यामुळे त्यासंदर्भातील कार्यवाही झाली नाही. शाळा सुरु होताच पोर्टल निर्मितीची तयारी सुरु होणे अपेक्षित होते, पण त्यासाठी विलंब लागला. त्याचवेळी ‘एनआयसी’ने पोर्टलचे काम करण्यास नकार कळविला. त्यानंतर नवीन खासगी संस्था नेमण्यात आली. आता सरकारकडून त्या कंपनीला सर्व डेटा देण्यात आला असून अजूनही ३० टक्के काम राहिलेले आहे. त्यामुळे शिक्षकांची प्राथमिक माहिती भरणे (नियुक्ती दिनांक, जन्म दिनांक, जात प्रवर्ग, शाळा, जिल्हा, बदली कुठे पाहिजे ज्याची माहिती) अपेक्षित आहे. सध्या पोर्टल अर्धवट स्थितीत असल्याने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडेच ती माहिती ऑफलाइन द्यावी लागत आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांच्या बदलीसंदर्भात दोन्ही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाते आणि त्यानंतर ऑनलाइन पध्दतीने त्या शिक्षकांच्या बदल्या होतील. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अंदाजित दोन महिने लागतील, असेही सूत्रांनी सांगितले.
दोन्ही मंत्र्यांची आज बैठक
राज्यातील शाळा १३ जून रोजी सुरु होणार आहेत. तत्पूर्वी, बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, पोर्टलचे काम अजूनही अर्पणच असल्याने ३० जूनपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होतील, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. पण, प्रत्यक्षात बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जुलै उजाडेल, अशी सद्यस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे.
शिक्षक बदल्यांचे टप्पे…
– पोर्टलचे काम अपूर्ण असल्याने ३१ मेऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ
– पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना ८-१० दिवसांत भरावी लागणार वैयक्तिक माहिती
– दरवर्षी अंदाजित अडीच लाख शिक्षक करतात आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज
– जात प्रवर्गानुसार रिक्त जागांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे घ्यावे लागते ना हरकत प्रमाणपत्र
– एकाच जिल्ह्यात तीन ते पाच वर्षांपर्यंत काम केलेले शिक्षकच बदल्यांसाठी पात्र
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button