♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेगाव हादरलं ! मटण मार्केट परिसरात युवकाची निर्घृण हत्या;  जुन्या वादातून हत्येचा अंदाज

MH 28 News Live / शेगाव : शहरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मध्यवस्तीतील मटण मार्केट परिसरात एका युवकाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सायंकाळी सुमारे सहा वाजता घडली असून, मृत युवकाचे नाव नितीन उर्फ गोल्या गायकवाड असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गायकवाड सायंकाळी मटण मार्केट परिसरात आला असता, तीन ते चार साथीदारांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने वार करून जागीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिकांच्या आरडाओरडीत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी थाणेदार रामकृष्ण पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आला असून तपास सुरू आहे.

या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी शेगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके सक्रिय करण्यात आली आहेत.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शेगाव शहरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहेत पुढील तपास शेगाव शहर पोलिस करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129