
देऊळगाव मही पंचक्रोशीतील त्रस्त जनतेचे महावितरणला निवेदन; लोंबलेल्या तारा आणि वाकलेले पोल दुरुस्त करा अन्यथा करणार आंदोलन
MH 28 News Live, देऊळगाव मही : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देऊळगाव मही सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील नादुरुस्त झालेल्या विद्युत वाहिन्या पूर्ववत दुरुस्त करण्यात याव्या अशी मागणी ग्रामीण भागातील रहिवासी व शेतकऱ्यांनी महावितरणचे जळगाव राजा येथील उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ३० मार्च रोजी केली आहे.
महावितरणच्या देऊळगाव नही सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या टाकरखेड भागिले, खैराव, डिग्रस बु ।।, नागणगाव, पाडळी, सावखेड, नारायणखेड व निमगाव गुरु या गावातील विद्युत वाहिन्यांचे तार काही ठिकाणी लोंबलेले असून पोल देखील वाकलेले आहेत. यामुळे शेतकरी, स्थानिक गावकरी आणि जनावरांच्या जिवाला धोका उत्पन्न होण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय या लांबलेल्या तारा आणि वाकलेल्या पोलमुळे विद्युत पुरवठा देखील वेळोवेळी खंडित होत असतो. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन तसेच विजेच्या लोंबलेल्या तारांमुळे कुणाला विजेचा धक्का लागू नये, शॉर्टसर्किट होऊन आग लागू नये तसेच इतर जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी जागोजागी लोंबलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा आणि वाकलेले पोल त्वरित दुरुस्त करावेत जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यात व हिवाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही अशी विनंती निवेदनकर्त्यांनी केली आहे. आपली मागणी त्वरित मान्य न झाल्यास याबद्दल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रतीलिपी जिल्हाधिकारी तसेच बुलडाणा येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना देखील देण्यात आल्या आहेत.