♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘ अहमदनगर ‘ चे सुध्दा होणार लवकरच नामांतर. हे असेल नवीन नाव

MH 28 News Live, नागपूर : अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करण्यात येणार आहे. याबाबत मुंबईत लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केंद्र सरकारला पत्र पाठविले जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न केला होता. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी वरील माहिती दिली.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला असून त्यांच्या इतिहासाचे स्मरण होण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु राज्य सरकारने अद्यापही त्याची पूर्तता केली नाही, अशी खंत पडळकर यांनी व्यक्त केली.

प्रा. राम शिंदे, महादेव जानकर यांनीही उपप्रश्न विचारून या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यावर केसरकर म्हणाले, अहमदनगरच्या नामांतरासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका आयुक्त, विभागीय रेल्वे कार्यालय व्यवस्थापक, मुख्य पोस्ट ऑफिस तसेच तहसीलदार, महसूल विभागाला जिल्ह्याची माहिती सादर करण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये कळविण्यात आले आहे.

सदरची माहिती ऐतिहासिक असते. त्यामुळे माहिती संकलित करण्यात वेळ लागतो. तरीही सभागृहाची भावना लक्षात घेऊन या सर्व कार्यालयांना लवकरच स्मरणपत्रे पाठविण्यात येतील. तसेच यासंदर्भात मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केंद्र सरकारकडे शिफारसपत्र पाठविले जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली. केसरकर यांच्या या ग्वाहीमुळे सभागृहातील सर्व सदस्यांनी बाके बाजूने स्वागत केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129