
अस्वलाच्या हल्यात शेतकरी जखमी; करवंड परिसरात घबराट..!
MH 28 News Line, चिखली : अस्वलाच्या हल्यात 40 वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना दिनांक 29 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास चिखली तालुक्यातील करवंड येथे घडली.
बाबुराव दादाराव जाधव ( ४० ) रा. करवंड ता. चिखली असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ज्ञानगंगा अभयारण्याला लागूनच असलेल्या श्रीकृष्ण नगर भाग २ मध्ये या शेतकऱ्याचे शेत आहे. रविवारी सकाळी ते शेतात गेले होते. शेतात काम करीत असताना दोन पिल्ले सोबत असलेल्या मादीने त्यांच्यावर हल्ला चढवला यामध्ये शेतकऱ्यासोबत अस्वलाची झटापट झाली. अस्वलाने शेतकऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत केली. त्यांनी आरडाओरड केली असता लगतच्या शेतातील शेतकरी त्यांच्या मदतीसाठी धावून आले. दरम्यान मादी आणि दोन पिल्लाने जंगलाच्या दिशेने पळ काढला, जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात गत काही दिवसापासून शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचा हल्ला होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.