
मागासवर्गीय विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
MH 28 News Live, बुलडाणा : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाचे संलग्न असलेल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे.
योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणाली व सन २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष, नूतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी दि. २१ सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष व नूतनीकरणास प्रवेशित असलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे लागणार आहे.
सन २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षाच्या महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 8 हजार 852, इतर मागास प्रवर्ग, विजाभज व विमाप्र प्रवर्गाचे २२ हजार ७७१ अर्ज भरण्यात आले आहे. संपूर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ आणि व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित, तसेच योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर भरून घेण्याची कार्यवाही करावी.
कार्यशाळा घेऊन याबाबतची सूचना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यात पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडीबीटी प्रणालीवर आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्राचार्यांनी घ्यावी. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button