![](https://mh28newslive.com/r3e/uploads/2023/03/IMG20230323150016-780x470.jpg)
शासकीय मुद्रांकाचा तुटवडा; काळ्या बाजाराला आला ऊत. चिखलीकरांना नाहक भुर्दंड
MH 28 News Live, चिखली : गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम सर्वच शासकीय यंत्रणांवर झाला होता. यादरम्यान शासकीय मुद्रांकाची देखील टंचाई निर्माण झाली होती. मात्र संप मिटून दोन दिवस उलटले तरी सुध्दा चिखलीमध्ये शासकीय मुद्रांकाचा तुटवडा जाणवत असून अव्वाच्या सव्वा दराने या तिकीटांचा काळा बाजार होत असल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
जुन्या पेंशनच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी दि. १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व विभागांचे कामकाज ठप्प झाले आणि परिणामी जनतेला वेठीस धरले गेले. दि. १९ मार्चला हा संप मिटला. त्यानंतर शासकीय कार्यालयातील कामकाज पूर्ववत सुरू होईल अशी अपेक्षा सामान्य माणसाला होती. परंतु, सध्या या विपरीत चित्र पहायला मिळत आहे. विशेषतः शासकीय कोषागाराची गाडी अद्यापही रुळावर आली नसल्याने चिखली शहरात शासकीय मुद्रांकाचा तुटवडा जाणवत आहे.
काळ्या बाजाराला आला ऊत
पुरेश्या प्रमाणात तिकीटे आणि मुद्रांक मिळत नसल्याने शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांच्यासह गरजूंना तिकीटांसाठी धावाधाव करावी लागते. परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडे पाच आणि दहा रुपयांची तिकीटे उपलब्ध नसल्याने ज्यांना तिकीटांची आवश्यकता आहे ते त्रस्त झाले आहेत. मोठ्या किमतीच्या मुद्रांक खरेदीसाठी अक्षरशः रांगा लावाव्या लागत असून लहान तिकीटांचा खडखडाट असल्याने पाच आणि दहा रुपयांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री होत आहे. जुन्या तहसील कार्यालय परिसरातील काही पान टपरीवर, झेरॉक्सच्या दुकानात, डेली निड्सच्या दुकानात आणि जाँबवर्क सेंटरवर पाच रुपयांचे तिकीट दहा रुपयाला तर दहा रुपयाचे तिकीट विस रुपयाला विकले जात आहे. या काळ्या बाजारामुळे चिखलीकरांना मात्र नाहक भुर्दंड सहन करावा लागत असून संबंधित विभातील अधिकार्यांनी या बाबींची दखल घेऊन तातडीने मुद्रांक व तिकीटांचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात करावा आणि तिकीटांचा काळाबाजार ताबडतोब रोखावा अशी मागणी त्रस्त चिखलीकर करत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button