भक्ती महामार्ग त्वरित रद्द करा – श्वेताताईंनी मुख्यमंत्र्यांसमक्ष विधानसभेत मांडली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भावना
MH 28 News Live : चिखली : सिंदखेड राजा ते शेगाव यांना जोडणारा ११० किलोमीटरच्या भक्ती महामार्ग मार्गात जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा मेहकर व चिखली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची सुपीक अशी १२०० हेक्टर शेतजमीन जात आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाचा या महामार्गाला विरोध होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही तीव्र भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने हा महामार्ग त्वरित रद्द करावा अशी आग्रही मागणी आ. श्वेताताई महाले यांनी दि. ११ जुलै रोजी विधानसभेत केली.
ऐतिहासिक नगरी सिंदखेड राजा ते विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव भक्ती महामार्गाची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पात नुकतीच केली. मात्र ११० किलोमीटर लांबी व ४०० फूट रुंदीच्या या महामार्गात सिंदखेड राजा, देऊळगाव राजा व चिखली तालुक्यातील जवळपास बाराशे एकर सुपीक जमीन जात असल्यामुळे सदर जमिनीचे मालक असलेले शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे सिंदखेड राजा व चिखली या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या महामार्गाच्या विरोधात ठराव पारित केल्याचे आ. श्वेताताई महाले यांनी सांगितले. आंदोलन व उपोषणाच्या माध्यमातून सुद्धा आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केल्याची बाब श्रीमती महाले यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. श्वेताताई महाले यांचे भाषण सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सभागृह उपस्थित होते. त्यांना उद्देशून आ. महाले आमदार महाले यांनी स्थानिक शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन नियोजित भक्ती महामार्ग राज्य शासनाने रद्द करावा या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला.
समृद्धी महामार्गासाठी इंटरचेंज मिळावा
आपल्या भाषणात पुढे आ. श्वेताताई महाले यांनी समृद्धी महामार्गासाठी इंटरचेंजची मागणी सभागृहात केली. चिखली, बुलढाणा, मोताळा व मलकापूर तालुक्यातील नागरिकांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी पळसखेड झाल्टा मार्गे असोला हा इंटरचेंज अतिशय जवळचा आहे. तो इंटरचेंज मिळावा अशी विनंती आ. महाले यांनी आज सभागृहात केली.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button