
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने काय व्यक्त केली खंत ? आणि त्यावर संयोजक काय म्हणाले ?
MH 28 News Live : तब्बल २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद कोल्हापूरकडे गेलं. कोल्हापूरचा पठ्ठ्या पृथ्वीराज पाटील २०२२ चा महाराष्ट्र केसरीचा विजेता झाला. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज पाटीलनं विशाल बनकरचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावलीय अंतिम सामन्यात विशाल बनकरवर त्यानं ५ – ४ नं मात केली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी एकच जल्लोष केला. पण अद्याप बक्षीसाची रक्कम मिळाली नसल्यानं व्यथीत झालेल्या पृथ्वीराजनं अखेर सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केली आहे.
बक्षिसाची जबाबदारी आमची नाही : संयोजक
पृथ्वीराजची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एबीपी माझानं कार्यक्रमाचे संयोजक दिपक पवार यांच्याशी संवाद साधला आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी आपली बाजू मांडताना ते म्हणाले की, ही स्पर्धा भरवताना साताऱ्याच्या तालिम संघानं आडीच ते तीन कोटी रूपये खर्च केले आहेत. बक्षीसाची रक्कम ही नगण्य आहे. मात्र ही बक्षिसाची रक्कम आम्ही द्यावी, असं कुठेच नमूद नाही. तसेच बक्षिसाची रक्कम ही कुस्तिगीर परिषदेकडून दिली जाते. ती आमची जबाबदारी नाही. मात्र त्यांनी मागणी केली तर आम्ही ती रक्कम द्यायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.



