
कुणीच नव्हते घरी; चोरट्यांनी केली चोरी… बुलढाण्यात मंगळसूत्र, पेंडल आणि रोख ३५ हजार रुपये घेऊन अज्ञात चोरटे पसार
MH 28 News Live / बुलढाणा : शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये रात्रीच्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यानी कुलूप तोडून घरफोडी केली. यात घरातील दागिने व ३५ हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. सदरचा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली असून तपास करत आहेत.
बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनीत वास्तव्यास असलेले संदीप वानखेडे यांच्या घरात चोरी झाली आहे. संदीप वानखेडे हे मागील एक आठवड्यापासून कुटुंबासह मूळ गावी आंबेटाकळी येथे गेले होते. यामुळे घर दोन दिवस बंद असल्याचे पाहून चोरट्यानी संधी साधली. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट फोडून त्यातील ३५ हजार रोख व सोन्याचं मंगळसूत्र व सोन्याचं पेंडाल चोरट्यांनी चोरून नेले.
दरम्यान आज सकाळी संदीप वानखेडे हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसून आला. यामुळे त्यांनी घरात जाऊन बघताच सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेले आढळून आले. याबाबत तात्काळ त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली जाऊन पाहणी केली व फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीमला बोलावून तपासणी केली. चोरीची तक्रार् बुलढाणा पोलिसात दिली असून अज्ञात चोरट्याचा तपास पोलीस करत आहेत.