♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समृद्धी महामार्गावर अटक: उत्तर प्रदेशचा अट्टल गुन्हेगार देशी कट्यासह जेरबंद

MH 28 News Live / सिंदखेडराजा : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ओळखला जाणारा समृद्धी द्रुतगती महामार्ग एकीकडे अपघातांसाठी चर्चेत असतानाच, गुन्हेगारी घटनांमुळेही वारंवार चर्चेत येत आहे. याच महामार्गावर बुलढाणा जिल्हा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक अट्टल गुन्हेगार जेरबंद झाला आहे. उत्तर प्रदेशातील हिस्ट्रीशीटर आरोपीकडून देशी बनावटीची पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

थरारक कारवाई समृद्धी महामार्गावर

लोणार तालुक्यातील बिबी पोलिसांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. समृद्धी महामार्गावर नागपूर-मुंबई लेनवरील खळेगाव शिवाराजवळील चॅनल क्रमांक ३०३-५ जवळ एक आयशर वाहन (क्रमांक MH 40 CD 0735) संशयास्पदरीत्या उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला खोटे नाव सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिक चौकशीत त्याचे नाव अदिल उर्फ मेराज मो. मुस्तकीम (रा. सोभीपूर, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे निष्पन्न झाले.

पिस्तुल, काडतुसे आणि रोख रक्कम जप्त

चालकाच्या अंगझडतीत दोन जीवंत काडतुसे आढळून आली. त्यामुळे अधिक संशय आल्याने पोलिसांनी त्याची बॅग तपासली असता, त्यात सिल्वर रंगाची देशी बनावटीची पिस्तुल आणि आणखी दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी आरोपीकडून पिस्तुल, चार जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि आयशर वाहन असा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार ठरला आरोपी

सदर आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेश राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, लूटमार, जबरी चोरी, फसवणूक, गँगवॉर, शस्त्र बाळगणे आणि विस्फोटक पदार्थ ठेवणे अशा गंभीर स्वरूपाच्या तब्बल सात गुन्ह्यांची नोंद आहे. तो प्रतापगड जिल्ह्यातील मान्थता पोलीस स्टेशनचा ‘हिस्ट्री शीटर’ गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. हा सराईत गुन्हेगार आपली ओळख लपवून नागपूर येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होता. हत्यारासह महाराष्ट्रात प्रवेश करून तो गंभीर गुन्ह्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सतर्क पोलिसांमुळे टळला अनुचित प्रकार

समृद्धी महामार्गावर २४ तास पेट्रोलिंग करणाऱ्या बुलढाणा पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार रोखण्यात यश आले आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पुढील तपास बिबी पोलीस करत आहेत.

कारवाईत सहभागी अधिकारी

या धाडसी कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि स्थानीय गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी केले. कारवाईत ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे, गणेश कड, अंमलदार अरुण सानप, रवींद्र बोरे, संदीप शिंदे, अर्जुन सांगळे, राजू आडवे, तसेच वाहतूक शाखेचे शिवानंद मुंडे आणि श्रीकृष्ण दूनगु यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129