
शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचा डोंगर; कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटातही दुकानदार करतात पिळवणूक
MH 28 News Live, मेहकर : या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागले होते. खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला होता आणि उत्पादनात घट घडून आली होती. निदान रब्बी हंगाम तरी सुखाचा जाईल या आशेने शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामाकडे आगेकूच केली मात्र रब्बी हंगामातही राज्यातील शेतकऱ्यांवर संकटांची मालिका कायम आहे.
नैसर्गिक संकटे कमी आहेत की काय म्हणून आता खत टंचाई आणि खतांचे अवाजवी दर वसूल करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. गत आठवड्यापासून वातावरणात मोठा बदल झाला, राज्यात थंडीचा उद्रेक बघायला मिळाला सोबतच दाट धुक्याची चादर ही वातावरणात कायम राहीली त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे.
आता कुठे वातावरणात अनुकूल बदल बघायला मिळत आहे, वातावरण आता निवळत आहे म्हणून रब्बी हंगामाच्या पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकांसाठी खतांचे डोस देणे अनिवार्य ठरणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातही एकीकडे वातावरण निवळले असून दुसरीकडे खतांच्या टंचाईचे कारण पुढे करून चढ्या दरात खतांची विक्री केली जात आहे तर काही विक्रेते आवश्यक खतासाठी दुसऱ्या खताची खरेदी सक्तीचे करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी जुन्या खतांना नव्या खतांच्या किमतीत विक्री केले जातं असल्याचा आरोप केला आहे.
कृषी सेवा केंद्र चालक खतांची टंचाई असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांनी जिल्ह्यातील सर्व कॄषीकेंद्रामध्ये जिल्हा गुणनियंत्रण, कृषी अधिकारी पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा मोबाईल नंबर कृषी केंद्र दुकानांमध्ये भिंती पत्रकावर सक्ती करावे जेणेकरून शेतकऱ्यांना होणारा त्रास वाचेल व अधिकार्याला माहिती मिळेल
अशी मागणी जामाजिक कार्यकर्ते सतीश मवाळ यांनी व्यक्त केली आहे.



