♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अपघात… अवैध वाळू वाहतुकीचा हैदोस काही थांबेना सलग तिसऱ्या दिवशीही अपघात; चिखलीत एक जखमी

MH 28 News Live / चिखली : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचे थैमान काही थांबण्याचं नाव घेत नाही आणि यामुळे होणारे अपघातही दिवसेंदिवस जीवघेणे ठरत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी घडलेल्या अशाच एका अपघातात, चिखली शहरातील खामगाव चौफुली परिसरात आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रकला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. या धडकेत मेटॅडोवर चालक जखमी झाला आहे.

हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर घडला. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने भरधाव वेगाने येत आंबेवाहक ट्रकला चिरडल्यासारखी धडक दिली. यामुळे चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित टिप्पर पोलिस ठाण्यात लावण्यात आला असला, तरी दुसरे वाहन घटनास्थळावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, अशा घटनांनंतरही प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्याकडून ठोस कारवाई न झाल्याचे वारंवार दिसून येत आहे.

नागरिकांमध्ये संतापाचा सूर असून, या अपघातांमागे महसूल विभाग व पोलीस यंत्रणेचे सौम्य धोरण, तसेच आर्थिक व्यवहार आणि राजकीय दबाव असल्याचा थेट आरोप केला जात आहे. वाढत्या अपघातांची मालिका, आणि त्यातही सातत्याने होणारी जीवितहानी पाहता, शासनाने आणि यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधिकच तीव्र झाली. दरम्यान, या अपघाताबाबत बातमी लिहीपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129