
सोन्याच्या लोभात तुरुंगवास… तहसीलदारांच्या नावाखाली सोन्याची फसवणूक; आरोपीस साडेतीन वर्षाचा कारावास
MH 28 News Live / चिखली : तहसीलदारांना दागिने पाहिजेत असे खोटे सांगून जवळपास दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीस चिखली न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. शेख बाबू शेख छोटू मिया (रा. रशीद टेकडी, ता. भोकर, जि. नांदेड) या आरोपीस दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावास, एक लाख रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत.

ही घटना ११ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली. फिर्यादी विठ्ठल हिम्मतराव गायकवाड हे दिघेकर ज्वेलर्समध्ये चालक म्हणून कार्यरत होते. आरोपी शेख बाबू हा “तहसीलदारांना दागिने पाहिजेत” असे सांगत दुकानात आला आणि दुकानमालक प्रकाश दिघेकर यांच्या नावाने विश्वास संपादन करून चार ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या व सहा ग्रॅमच्या दोन सोन्याच्या चैन असे एकूण १,४९,००० रुपयांचे दागिने घेऊन तहसील कार्यालयात जाण्याचे सांगून फिर्यादीसह निघाला. काही वेळातच त्याने थैलीतील दागिने काढून घेतले व रिकामी थैली परत देत पसार झाला.

या फसवणुकीच्या प्रकरणात चिखली पोलिसांनी गुन्हा क्रमांक ७१३/२०२३ कलम ३७९, ४२० भादवि प्रमाणे नोंदवून तपास सुरू केला. उपनिरीक्षक नितीनसिंग चव्हाण यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पुराव्यांच्या आधारे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी इरफान अली खान यांनी आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

न्यायालयाने आदेश दिला की आरोपीने दागिने मालक प्रकाश दिघेकर यांना नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये द्यावेत. तसेच कारावासाच्या शिक्षा सलग भोगाव्यात, अशी नोंद न्यायालयाच्या आदेशात करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अॅड. मोहम्मद बशीर मोहम्मद नसीर यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड यांनी सहाय्य केले.



