
” एक दुजे के लिए “… विहिरीत आढळले प्रेमी युगुलाचे मृतदेह. नांदुरा तालुक्यातील गोसिंग येथील ह्रदयद्रावक घटना
MH 28 News Live, नांदुरा : हिंदी चित्रपट स्रुष्टीमध्ये अजरामर झालेल्या ” एक दुजेके लिए ” या गाजलेल्या चित्रपटातील शेवट आज जिल्ह्यात अनुभवास आला. शेख अल्ताफ शेख शकील (२२ ) रा. गोसिंग आणि वैशाली गंगाराम तिळे (१७ ) रा. तरोडा नाथ, ता. मोताळा या प्रेमी युगुलाचे मृतदेह गोसिंग शिवारातील एका विहीरीत आढळून आल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.
या ह्रदयद्रावक घटनेसंदर्भात पोलीसांकडून प्राप्त झालेल्या माहितीवरुन गोसिंग येथील शेख अल्ताफ काल, २१ मार्च रोजी संध्याकाळी शेतात गेला होता. बकऱ्यांसाठी चारा आणतो, असे सांगून तो मोटरसायकल घेऊन गेला. मात्र रात्री बराच वेळ होऊनही परतला नाही. त्याची मोटारसायकल शेतात बांधावर उभी होती. काल रात्री उशिरा अल्ताफच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, नातेवाइक त्याचा शोध घेत होते. आज सकाळी सातच्या सुमारास गोसिंग शिवारातील वेरुळेकर यांच्या विहिरीच्या काठावर दोन मोबाइल व अल्ताफचा चष्मा दिसून आला.
ही माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने विहिरीत खाट सोडून मृतदेह काढत असताना अल्ताफसोबत आणखी एका मुलीचा मृतदेह आढळला. मुलगी मोताळा तालुक्यातील तरोडा नाथ येथील वैशाली गंगाराम तिळे असल्याचे समोर आले. दरम्यान, दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. मात्र असे असले तरी पोलीस वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहत आहेत. दोघांचे मृतदेह बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपास बोराखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करीत आहेत.



