
NEET च्या क्लाससाठी गेली, पण घरी नाही परतली… देऊळगाव राजामध्ये झाले मुलीचे अपहरण
MH 28 News Live, देऊळगाव राजा : काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये ९३ टक्के गुण मिळवणारी सिंदखेड राजा येथील मुलगी देऊळगाव राजा येथून बेपत्ता झाली आहे. या संदर्भात मुलीच्या वडिलांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून सदर मुलगी सिंदखेड राजा येथून देऊळगाव राजाला NEET चे क्लास करण्याकरता दररोज येत होती. नेहमीप्रमाणे ती काल १४ जून रोजी देखील मैत्रिणींसोबत सिंदखेड राजावरून सकाळी देऊळगाव राजाला आली; मात्र दुपारी ती आपल्या मैत्रिणी सोबत घरी परतली नसल्यामुळे तिचा वडिलांनी मैत्रिणीकडे चौकशी केली असता घडलेला प्रकार समोर आला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी देऊळगाव राजा येथे येऊन तिचा शोध घेतला परंतु, ती न आढळून आल्यामुळे अखेर वडिलांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.

मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार तक्रारीनुसार त्यांची १६ वर्षीय मुलगी काल मैत्रिणींसोबत देऊळगाव राजा येथे परम क्लासेस सासाठी गेली होती. दररोज दुपारी दीड पर्यंत ती परत येते मात्र घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजून गेला तरी ती परतली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. त्यावेळी मैत्रिणीच्या फोनवरून तुमच्या मुलीने कुणाला तरी फोन केला आणि माझे काका मला घ्यायला येणार आहेत असे तिने आम्हाला सांगितले त्यामुळे आम्ही सिंदखेडराजा येथे परत आलो असे तिच्या मैत्रिणींनी मुलीच्या वडिलांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी तातडीने देऊळगाव राजा बसस्थानक गाठून मुलीचा शोध घेतला मात्र मुलगी मिळून आली नाही. अंगात मेहंदी रंगाचा टॉप, काळ्या रंगाची असून लॉगिज, ५ फूट उंची, गोरा रंग, चेहरा गोल, हातात काळ्या रंगाची घड्याळ अशा वर्णनाच्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली.



