
धमक्यांच्या तणावात तरुणाचे टोकाचे पाऊल : प्रेयसी व तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल
MH 28 News Live / बुलढाणा : तालुक्यातील मढ गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसर हादरून गेला आहे. प्रेयसी व तिच्या आईकडून होणारा मानसिक त्रास सहन न झाल्याने सागर युवराज केदार (वय २८) या तरुणाने अखेर गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सागरचे त्याच गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला प्रेयसीची आई विरोध करत होती. या विरोधातून सागरला सतत मानसिक त्रास देण्यात येत होता. शिवाय, प्रेयसीकडून ‘माझी आई तुला ठार करेल, मी तुला फाशी देईन, मला आयुष्यात त्रास दिलास तर मी माझ्या आईला घेऊन तुझ्या घरी येईन व तुझा जीव घेईन’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या.

या छळामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या सागरने आत्महत्येचा मार्ग निवडला. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

सागरचे वडील युवराज केदार यांच्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात मृतकाच्या प्रेयसी व तिच्या आईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मढ गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.



