♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धक्कादायक..!. रस्त्यावर झाली महिलेची प्रसूती ; महिला वेदनेने तडफडत असताना स्टाफ नर्सने मदतीस नकार दिल्याचा आरोप

MH 28 News Live / मेहकर : मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावर एका महिलेची चक्क रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. प्रसूतीच्या वेदनांनी महिला रस्त्यावर तडफडत असताना मदतीसाठी ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सकडे धाव घेण्यात आली. मात्र, स्टाफ नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अखेर एका खासगी रुग्णालयातील नर्सच्या मदतीने रस्त्यावरच महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली.

बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांच्या शेजारी पिसे परिवार वास्तव्यास आहे. या परिवारातील महिलेला बुधवारी सकाळी सुमारे सहा वाजता अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. पोटात तीव्र वेदना होत असल्याने महिलेला रुग्णालयात नेण्याची गरज निर्माण झाली. मात्र, तिला रुग्णालयात नेण्यासाठी घरात अन्य कोणी उपलब्ध नव्हते. महिला स्वतः चालत बाहेर आली असता ती रुग्णालयाच्या परिसरातील ओट्यावरच कोसळली. त्यावेळी बाळाचा काही भाग बाहेर आला होता, तर काही भाग गर्भातच असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली.

ही परिस्थिती पाहून योगेश सौभागे यांनी तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यांनी स्टाफ नर्सला रस्त्यावर महिलेची प्रसूती होत असल्याची माहिती देत तातडीने मदतीसाठी घटनास्थळी येण्याची विनंती केली. मात्र, “रुग्णालयात कोणीही नाही, डॉक्टर नाहीत, मी एकटी आहे, त्यामुळे मला बाहेर येता येणार नाही,” असे सांगून स्टाफ नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचे सौभागे यांनी सांगितले.

महिलेची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याने सौभागे यांनी पुन्हा स्टाफ नर्सला विनंती केली. “महिलेचे अर्धे बाळ आत आणि अर्धे बाहेर आहे. आम्हाला काय करावे हे कळत नाही. तुम्ही तातडीने चला,” अशी आर्त विनंती करण्यात आली. मात्र, तरीही घटनास्थळी येऊन मदत करण्यास नकार मिळाल्याचा आरोप आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योगेश सौभागे यांनी प्रसंगावधान राखत एका खासगी रुग्णालयातील स्टाफ नर्सची मदत घेतली. सौभागे परिवारातील महिलांनीही सहकार्य केले. अखेर रस्त्यावरच महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. त्यानंतर प्रसूत महिलेला आणि नवजात बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर प्रसूतीच्या वेदनांनी महिला तडफडत असताना तिला तातडीची वैद्यकीय मदत मिळाली नाही, हा प्रकार आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. स्टाफ नर्सने घटनास्थळी जाण्यास नकार दिल्याच्या आरोपाची प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129