
अज्ञात चोरट्यांनी एसबीआय एटीएम फोडून केले ७ लाख रुपये लंपास
MH 28 News Live / मोताळा : शहरातील तहसील कार्यालय चौक परिसरात असलेल्या State Bank of India (एसबीआय)च्या एटीएम सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर धाडसी चोरी करत सुमारे सात लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून त्यामधील रोकड पळवली. सकाळी नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ बोराखेडी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलिसांनी एटीएम सेंटरमधील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून त्याची बारकाईने तपासणी सुरू आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर, फॉरेन्सिक पथक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी तपासाची दिशा निश्चित केली.

प्राथमिक तपासात चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरोपींचा कोणताही ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे शहरातील बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



