
हुंडा कमी दिल्याने विवाहितेचा छळ; जळगाव जामोद येथे पतीसह ८ जणांवर गुन्हा दाखल
MH 28 News Live / जळगाव जामोद : लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून एका ३२ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहेराहून आणखी १० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकत तिचा छळ केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अर्चना उत्कर्ष खोटरे (वय ३२, रा. पळसखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या मंडळींवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

चारित्र्यावर संशय आणि १० लाखांची मागणी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना यांचा विवाह ७ मार्च २०२५ रोजी उत्कर्ष खोटरे यांच्याशी झाला होता. लग्नाचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. ‘लग्नात हुंडा कमी मिळाला’ असे म्हणत पती, सासू-सासरे आणि जेठ यांनी अर्चना यांना टोमणे मारणे व त्रास देणे सुरू केले. इतकेच नव्हे तर अर्चना यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन त्यांना मानसिकदृष्ट्या खचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही दिवसांनी सासरच्यांनी छळाची सीमा पार करत, अर्चना यांच्याकडे माहेराहून १० लाख रुपये रोख आणण्यासाठी तगादा लावला. अर्चना यांनी याला नकार दिला असता, त्यांना शारीरिक आणि मानसिक पातळीवर अमानुष त्रास देण्यात आला.

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सासरच्या जाचाला कंटाळून अखेर पीडित अर्चना खोटरे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर मांडला. त्यांच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत पती, सासू, सासरे, जेठ यांच्यासह सासरच्या एकूण आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून, विवाहितेचा छळ करणाऱ्या संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. जळगाव जामोद पोलीस पुढील तपास करत आहेत.



