
खडकपूर्णा रिकामे, पलढग चिंताजनक; पेनटाकळी – ज्ञानगंगा देताहेत दिलासा
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला असता पाणीपुरवठ्याची संपूर्ण व्यवस्था सध्या काही मोजक्या प्रकल्पांच्या भरोशावर असल्याचे चित्र समोर आले आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा पूर्णपणे संपुष्टात आल्याने प्रशासनासमोर नव्या चिंतेचे आव्हान उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत पेनटाकळी, ज्ञानगंगा आणि कोराडी या प्रकल्पांतील शिल्लक साठा जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरत असला, तरी बहुतांश मध्यम व लघु प्रकल्पांमधील झपाट्याने घटणारी पातळी भविष्यातील पाणीटंचाईचे संकेत देत आहे.

मोठ्या प्रकल्पांपैकी पेनटाकळी धरण तुलनेने समाधानकारक स्थितीत असून ५९.९७ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी सध्या २२.१४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३६.९३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तसेच नळगंगा धरणात ३९.३८ टक्के साठा शिल्लक असून जिल्ह्याच्या पाणीगरजा भागविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आधार मानला जात आहे. मात्र खडकपूर्णा धरणातील उपयुक्त साठा शून्यावर आल्याने इतर जलस्रोतांवरील ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने दडी मारल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

मध्यम प्रकल्पांमध्ये ज्ञानगंगा धरण सर्वाधिक सक्षम स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोराडी धरणात ४०.६१ टक्के, मस प्रकल्पात २९.४५ टक्के तर मन प्रकल्पात २४.७४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी साठ्यातील सातत्याने होणारी घट चिंताजनक मानली जात आहे. दरम्यान, पलढग प्रकल्पाची अवस्था सर्वाधिक गंभीर असून येथे केवळ ०.१७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच अवघा २.२६ टक्के साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या परिसरातील भविष्यातील पाणीपुरवठ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकारात्मक बाब म्हणजे काही प्रकल्पांनी गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा नोंदविली आहे. विशेषतः कोराडी धरणातील जलसाठा मागील वर्षीच्या २२.२२ टक्क्यांवरून यंदा ४०.६१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र एकूणच जिल्ह्यातील जलस्थिती पाहता मान्सूनकडे सर्वांचे लक्ष लागले असून, दमदार पावसाशिवाय पाणीटंचाईचे संकट टळणे कठीण असल्याचे चित्र दिसून येत आहे.



