
शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! शेतीकामांसाठी मुरूम, माती, गाळ रॉयल्टीमुक्त; ट्रॅक्टरवर कारवाई नाही; राज्य शासनाचा निर्णय
MH 28 News Live : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेती आणि ग्रामीण विकासाच्या कामांसाठी लागणारे मुरूम, माती, गाळ तसेच इतर गौणखनिजांचा वापर आता रॉयल्टीशिवाय करता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याची घोषणा केली.

या निर्णयानुसार शेतकऱ्यांना विहिरी, शेततळी, गोठे, शेतघर, शेतरस्त्यांची दुरुस्ती, पावसाळ्यातील चिखल काढणे, जलसंधारणाची कामे तसेच शेतीसाठी आवश्यक इतर कामांसाठी माती, गाळ, मुरूम आणि दगड यांसारखी गौणखनिजे विनारॉयल्टी वापरता येणार आहेत. ही खनिजे स्वतःच्या शेतातून तसेच तलाव, ओढे, पाझर तलाव आणि शासनाच्या अखत्यारीतील जलस्रोतांमधून नियमानुसार उपलब्ध करून घेता येतील.
यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक तलाठीकडे साधा अर्ज करायचा असून, संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित जागा जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत असल्यास त्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे आवश्यक राहील.
शासनाने स्पष्ट केले आहे की, वैयक्तिक शेतीच्या कामासाठी परवानगी घेऊन मुरूम किंवा माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाड्यांवर तहसीलदार, महसूल किंवा पोलिस प्रशासनाकडून कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे.
मात्र, ही सवलत केवळ शेतकरी आणि त्यांच्या वैयक्तिक शेतीसंबंधित कामांसाठीच लागू राहणार आहे. गौणखनिजांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर किंवा विक्री झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध विद्यमान कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.



