♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दोन दिवसांतच संपलं बालपण ! स्वच्छतागृहाच्या अभावाने आश्रमशाळेतील चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू

MH 28 News Live / जळगाव जामोद : तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील सरस्वती निवासी आश्रमशाळेत घडलेली घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी ठरली आहे. शिक्षणासाठी आई-वडिलांनी मोठ्या आशेने आश्रमशाळेत दाखल केलेल्या अवघ्या पाचवीतील मोहित वाकुडकर या चिमुकल्याचा स्वच्छतागृहाच्या अभावामुळे नैसर्गिक विधीसाठी शाळेबाहेर जावे लागले आणि त्याचवेळी पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मोहितने या आश्रमशाळेत अवघ्या दोन दिवसांपूर्वीच प्रवेश घेतला होता. त्यामुळे एका निष्पाप जीवाचा झालेला करुण अंत संपूर्ण जिल्ह्याला सुन्न करून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळच्या वेळी मोहितला नैसर्गिक विधीसाठी बाहेर जावे लागले. मात्र, आश्रमशाळेत पुरेशी स्वच्छतागृहे व आवश्यक सुविधा नसल्याने तो शाळेच्या परिसरातून बाहेर गेला. त्यावेळी तोल जाऊन तो जवळील पाण्यात पडला. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि वेळेत मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शिक्षणाच्या मंदिरात सुरक्षित भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या या चिमुकल्याचा अशा प्रकारे झालेला मृत्यू अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करून गेला आहे.

सुविधांच्या दाव्यांची पोलखोल

या घटनेने निवासी आश्रमशाळांमधील सोयी – सुविधांच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल झाली आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांच्या निवास, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही विद्यार्थ्यांना साधी स्वच्छतागृहाची सुविधा मिळत नसल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे. जर शाळेत आवश्यक सुविधा उपलब्ध असत्या, तर मोहितला बाहेर जाण्याची वेळच आली नसती आणि आज त्याचा जीवही वाचला असता, अशी तीव्र भावना नागरिक आणि पालकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे हा केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे भयावह उदाहरण असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

आक्रोशाने गहिवरला परिसर

मोहितच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन दिवसांपूर्वी हसत-खेळत शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवलेला मुलगा कायमचा निघून गेल्याने आई-वडिलांचा हंबरडा पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आश्रमशाळेबाहेर मोठी गर्दी करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. निष्पाप विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली.

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

आश्रमशाळा प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणामुळेच मोहितला आपला जीव गमवावा लागल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा, मूलभूत सुविधांचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका निष्पाप बालकाचा बळी गेल्यानंतर तरी शासन आणि संबंधित यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129