
BDCC बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; २३ ऑगस्टला मतदान, २४ ला मतमोजणी
MH 28 News Live / बुलढाणा : दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली असून, २३ ऑगस्ट रोजी मतदान तर २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी गौतम वर्धन यांनी १६ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला. त्यानुसार २० जुलै रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. त्याच दिवसापासून २४ जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची छाननी २५ जुलै रोजी होणार असून, २७ जुलैला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २७ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. आवश्यकतेनुसार २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
संचालक मंडळासाठी तालुकानिहाय १३ मतदारसंघांतून प्रत्येकी एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे. याशिवाय महिला प्रतिनिधींसाठी दोन जागा तसेच अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती अथवा इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.



