
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण पूर्ण करा जिल्ह्यात 1 लाख 16 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध
MH 28 News Live / बुलढाणा :शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र १ लाख १६ हजार ४३६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. या याद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावचे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, बँक शाखा तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकरी बांधवांनी त्वरित आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हास्तरीय कर्जमुक्ती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांमध्ये नाव असलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी (Farmer ID) आणि आधार कार्ड सोबत घेऊन नजीकच्या ई-सेवा केंद्रावर जावून आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय अथवा तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने दाद मागता येणार आहे.
सदर कर्जमुक्ती योजनेचे कामकाज सहकार विभाग, महसूल विभाग आणि बँक प्रशासन यांच्यामार्फत एकत्रित व सुयोग्य प्रकारे केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये विनाकारण गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली आहेत, त्यांनी विलंब न करता नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.



