
आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून चिखलीत साकारणार भव्य शिवसृष्टी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक संपन्न; पंधरा दिवसात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश
MH 28 News Live / चिखली : विधानसभा मतदारसंघातील हातणी व वळती येथे उभारण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क व शिवसृष्टी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मोठी गती मिळाली आहे. आमदार महाले यांनी यापूर्वी राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभूराजे देसाई यांना पत्र देऊन या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे उपस्थित होते. यावेळी पर्यटन मंत्री ना. शंभूराजे देसाई यांनी “छत्रपती शिवाजी महाराज थीम प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या १५ दिवसांत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर करावा,” असे निर्देश दिले. तर पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांनी आवश्यकता भासल्यास पर्यटन विभागाबरोबरच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
सुमारे ६५ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्शन घडविणारे भव्य हेरिटेज थीम पार्क उभारले जाणार आहे. पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक सभागृहे, परिषद केंद्र, मोठा बँक्वेट हॉल, एमटीडीसीचे सुसज्ज रिसॉर्ट, शिवकालीन इतिहास उलगडणारे संग्रहालय, महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडविणारे दालन, अत्याधुनिक ३६० अंश डोम शो, खुल्या आकाशाखालील भव्य रंगमंच, स्थानिक हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे फूड कोर्ट व क्राफ्ट बाजार, मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, निसर्गरम्य पायवाटा आणि कुटुंबांसाठी विरंगुळ्याच्या विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प केवळ पर्यटन केंद्र न राहता इतिहास, संस्कृती, शिक्षण, मनोरंजन आणि आधुनिक पर्यटन यांचा संगम ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे चिखली विधानसभा मतदारसंघाची ओळख केवळ बुलढाणा जिल्ह्यापुरती मर्यादित राहणार नसून संपूर्ण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्र म्हणून निर्माण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अनुभव घेण्यासाठी राज्यासह देशभरातून पर्यटक येथे आकर्षित होतील. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, हॉटेल, वाहतूक, हस्तकला, स्थानिक उद्योग आणि इतर पूरक व्यवसायांना मोठी संधी निर्माण होईल. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच परिसरातील आर्थिक विकासाला नवी गती मिळेल आणि चिखलीची ओळख राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे उमटेल.
या प्रकल्पामुळे चिखली हे केवळ एक पर्यटन स्थळ न राहता अजिंठा लेणी, लोणार सरोवर, सिंदखेडराजा (राजमाता जिजाऊ जन्मस्थळ) आणि शेगाव (श्री गजानन महाराज मंदिर) या महाराष्ट्रातील चार जागतिक व ऐतिहासिक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या केंद्रबिंदू म्हणून विकसित होणार आहे.त्यामुळे आजवर केवळ प्रवासातील मार्ग म्हणून ओळख असलेले चिखली आता विदर्भातील पर्यटनाचे प्रवेशद्वार आणि महाराष्ट्राच्या पर्यटन सर्किटमधील प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल.
आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क (शिवसृष्टी)’ प्रकल्प आता प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या इतिहासात हा प्रकल्प एक नवा आणि अभिमानास्पद अध्याय ठरणार असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे…



