
“जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी…”; हुतात्मा हरीदास कापसेंना अश्रूंतून अखेरची सलामी
MH 28 News Live / चिखली : भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर प्राणांची आहुती देणारे चिखली तालुक्यातील शेलसूरचे सुपुत्र, पॅरा कमांडो हवालदार हरीदास मधुकर कापसे यांना आज अश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर शेलसूर येथे संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवानाच्या अंतिम दर्शनासाठी चिखली तालुक्यासह परिसरातील हजारो नागरिकांनी शेलसूर येथे गर्दी केली होती. ‘हुतात्मा हरीदास कापसे अमर रहे… अमर रहे!’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
हुतात्मा हरीदास कापसे यांच्या निवासस्थानापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आमदार श्वेताताई महाले, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत आणि भारतमातेच्या या वीर सुपुत्राला नतमस्तक होत श्रद्धांजली अर्पण केली. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि हृदयात आपल्या वीर जवानाच्या शौर्याचा अभिमान होता.
भारत – चीन सीमेवरील उत्तराखंडमधील सुमना-लपतल येथे कर्तव्य बजावत असताना दि. ७ ऑगस्ट रोजी हरीदास कापसे यांना वीरमरण आले. त्यांच्या वीरमरणाची वार्ता समजताच चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली. सोमवारी दि. १० ऑगस्ट रोजी त्यांचे पार्थिव चिखली शहरात दाखल झाल्यानंतर अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानाच्या शौर्याला आणि देशसेवेला नागरिकांनी मनापासून सलाम केला.
“ऐ मेरे वतन के लोगों, ज़रा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुर्बानी…” या अजरामर गीतातील ओळी आज शेलसूरच्या वातावरणात अक्षरशः जिवंत झाल्याची अनुभूती येत होती. हरीदास कापसे यांचे बलिदान केवळ त्यांच्या कुटुंबाचे दुःख नाही, तर संपूर्ण समाजाच्या हृदयाला चटका लावणारी घटना आहे. देशाच्या सीमेवर शत्रूशी दोन हात करताना प्राणांची पर्वा न करणाऱ्या या वीराचे बलिदान देशवासीयांच्या स्मरणात सदैव जिवंत राहील.
“देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानाच्या शौर्याला आणि देशसेवेला मनःपूर्वक सलाम. हरीदास कापसे यांच्या सर्वोच्च बलिदानाचा शेलसूर गावासह संपूर्ण चिखली मतदारसंघाला अभिमान आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. परमेश्वराने कापसे कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी आणि वीर जवानाच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभावी,” अशा शब्दांत आ. श्वेताताई महाले यांनी हुतात्मा हरीदास कापसे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
लष्करी इतमामात झालेल्या या अखेरच्या निरोपावेळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते; मात्र त्या अश्रूंमध्ये दुःखासोबत आपल्या वीर सुपुत्राच्या शौर्याचा अभिमानही होता. भारताच्या तिरंग्याला आपल्या रक्ताने अधिक गौरव मिळवून देणाऱ्या हरीदास कापसे यांना शेलसूरने अखेरचा निरोप दिला; मात्र त्यांचे बलिदान आणि त्यांची देशभक्ती कायम स्मरणात राहणार आहे.



