♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सदस्य नोंदणी अभियानात सहभागी व्हा !

MH 28 News Live / बुलढाणा : राज्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या परवाना व बॅजधारक चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’च्या सदस्य नोंदणी अभियानाला वेग आला आहे. या अभियानांतर्गत आगामी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यात १ लाख सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यातील पात्र वाहनचालकांनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, खामगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शासकीय शुद्धीपत्रकानुसार यापूर्वीच्या योजनेत सुधारणा करून आता ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी, पर्यटन वाहने तसेच सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविण्याचा परवाना (Driving Licence) व बॅजधारक असलेल्या चालकांना या मंडळाचे सभासदत्व मिळण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मंडळाचे नाव ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असे निश्चित करण्यात आले आहे.

परिवहन मंत्री तथा मंडळाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत राज्यातील सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यानुसार प्रत्येक प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत परवाना व बॅजधारक चालकांपैकी किमान १० टक्के चालकांची मंडळाचे सदस्य म्हणून नोंदणी करण्याचे नियोजन केले आहे.

मंडळाच्या सभासदांना मिळणारे विविध फायदे व योजना: अपघाती किंवा नैसर्गिक प्रसंगी आर्थिक संरक्षण, चालकांसाठी आरोग्यविषयक सुविधा व मदत, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत, चालकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. कामगारांच्या कौशल्य विकासासाठी विशेष प्रशिक्षण योजना, ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा व मिटर्ड टॅक्सी परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजना, नवीन वाहन खरेदी, गृह खरेदी किंवा घर दुरुस्तीसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची अंशतः प्रतिपूर्ती, राज्यस्तरीय मंडळ व शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ.

परिवहन (Transport) वाहने चालविण्याचा परवाना व बॅजधारक असलेल्या सर्व पात्र चालकांनी या योजनेची माहिती घेऊन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, खामगाव यांच्या माध्यमातून आपली नोंदणी त्वरित पूर्ण करावी आणि शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129