
ही तर सिनेस्टाईल रोड रॉबरी… गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’चा बोर्ड, सायरनचा धाक; स्कोडातून आलेल्या चौघांनी ‘ समृद्धी ‘ वर कांद्याचा ट्रक
MH 28 News Live / डोणगाव : नाशिकहून झारखंडकडे कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकला समृद्धी महामार्गावर ‘महाराष्ट्र शासन’ असा फलक आणि सायरन लावलेल्या आलिशान स्कोडा कारमधून आलेल्या चौघांनी अडविले. शनिवारी (२६ सप्टेंबर) मध्यरात्री डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. आरोपींनी ट्रकचालकाला बेदम मारहाण करून ट्रक ताब्यात घेतला आणि गंभीर जखमी अवस्थेत त्याला महामार्गावरच सोडून ट्रक घेऊन पसार झाले. या धक्कादायक घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
‘११२’ वर फोन; पोलिसांची तातडीने नाकाबंदी
आरोपी निघून गेल्यानंतर जखमी चालकाने तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी समृद्धी महामार्गाच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधून आरोपींच्या वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी काही तासांतच वाशिम जिल्ह्यातून स्कोडा कारसह चार संशयितांना ताब्यात घेतले. चौघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले.



