♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

देऊळगाव राज्यात शांतता समितीची बैठक ठरली वादळी; आजी -:माजी आमदारांचा पोलिसांवर हल्लाबोल; कार्यशैलीवरून प्रशासनाला धरले धारेवर

 

MH 28 News Live / देऊळगाव राजा : आगामी श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मागील आठवड्यात घडलेल्या हिंसक घटनेचे पडसाद उमटले. आमदार मनोज कायंदे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. पोलिसांनी निष्पक्षपणे काम करून कायद्याचा दरारा कायम ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीतील चर्चेमुळे काही काळ वातावरण तापले; मात्र अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी निष्पाप व्यक्तींवर अन्याय होणार नाही आणि कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर बैठकीचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला.

स्थानिक नगरपरिषदेच्या सभागृहात श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव तसेच शहरात अलीकडेच घडलेल्या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे, देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ब्रह्मा गिरी, अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार शक्करघे आणि किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मातोंडकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी श्री बालाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ठाणेदार ब्रह्मा गिरी यांनी प्रास्ताविक केले. शांतता समितीच्या सदस्यांनी बालाजी यात्रा आणि दुर्गादेवी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला विविध सूचना केल्या. मात्र, अध्यक्षीय भाषणादरम्यान मागील आठवड्यातील हिंसक घटनेचा विषय निघताच चर्चेला वेगळे वळण मिळाले.

‘पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावे’

आमदार मनोज कायंदे यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे शांत आणि सुसंस्कृत शहराच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे मत त्यांनी मांडले. पोलिसांनी आपला दरारा कायम ठेवून कोणताही राजकीय दबाव न घेता निष्पक्षपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय मतभेद असले, तरी एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचे राजकारण आपण करीत नसल्याचे कायंदे यांनी नमूद केले. मागील आठवड्यातील खुनाच्या घटनेत निष्पाप युवकांवर झालेल्या कारवाईबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

माजी आमदारांकडून महसूल प्रशासनावरही प्रश्न

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आमदार कायंदे यांच्या भूमिकेला सहमती दर्शवली. पोलिसांनी कायद्याची कठोर आणि निष्पक्ष अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. याचवेळी अवैध वाळू उपशाच्या मुद्द्यावरून त्यांनी महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे बैठकीत पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कामकाजावर चर्चा रंगली.

‘गुन्हेगारांची गय केली जाणार नाही’

उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. हिंसक घटनेत कोणत्याही निरपराध व्यक्तीला गोवले जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.

श्री बालाजी महाराजांची यात्रा सर्व जाती-धर्मांतील नागरिकांचा सहभाग असलेला उत्सव आहे. शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि वैभवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी पोलिसांच्या कार्यशैलीबाबत उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रशासनाने दिलेली कारवाईची ग्वाही यामुळे आगामी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा – सुव्यवस्थेचा मुद्दा केंद्रस्थानी आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सूरज गुप्ता यांनी केले. देऊळगाव राजा आणि सिंदखेडराजा तालुक्यांतील शांतता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129