
वाढत्या गर्मीमध्ये सनातन धर्म गुरुकुलने खामगावकरांसाठी जागोजागी सुरू केली पाणपोईची सुविधा
MH 28 News Live, खामगाव : एकीकडे आकाशामध्ये प्रचंड तापणारा सूर्य व त्यामुळे जमिनीवर आग ओकणारे ऊन आणि अंगाची लाहीलाही होणारी माणसे असे चित्र खामगावमध्ये सर्वत्र दिसत असताना या तापत्या उन्हापासून दिलासा देण्याचे काम सनातन धर्म गुरुकुलने खामगावकरांसाठी केले आहे. सनातन धर्म गुरुकुलच्या वतीने शहरातील विविध मंदिरांमध्ये थंडगार पाण्याचे रांजण ठेवून पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील प्रचंड उष्णतामान असलेले शहर म्हणून खामगावचा परिचय मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर आहे. या उन्हाळ्यात देखील खामगावकरांना प्रचंड उष्णतेचा त्रास होत असून त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या तापत्या उन्हात नागरीकांना दिलासा मिळावा या हेतूने सनातन धर्म गुरुकुलतर्फे शहरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये जगदंबा रोड, भादवीमाता मंदिर, टिळक मैदान, आठवडी बाजार, गुरुकुल गुरू सिंह सभा, रेल्वे स्टेशन रोड, शनी मंदिर फरशी, रेणुका माता मंदिर जनुना, वीर हनुमान मंदिर नांदुरा रोड आदी ठिकाणी या पाणपोया लावण्यात आल्या आहेत. रांजणांमध्ये असलेले थंडगार पाणी रस्त्याने जाणारे वाटसरू व आसपासचे व्यापारी यांची तहान शांत करून त्यांना कडक उन्हामध्ये दिलासा देण्याचे काम निश्चितपणे करत आहे. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते पंडित तोलाराम व्यास व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान लाभले असून खामगावकर सनातन धर्म गुरुकुलला या उपक्रमासाठी धन्यवाद देत आहेत.