
शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महा मार्गावरील बेशिस्त उभ्या असलेल्या वाहनावर कडक कारवाई करा – लोणारकरांची मागणी
MH 28 News Live, लोणार : लोणार हे ‘ अ ‘ दर्जाचे जागतिक पर्यटन स्थळ आहे. शहराची लोकसंख्या तीस हजारांपेक्षा ज्यास्त आहे. मोठी बाजार पेठ असल्याने या ठिकाणी अनेक खेड्यापाड्यातील लोक खरेदीसाठी येत असतात. परंतु, शहरात दाखल होताच त्यांना जागोजागी उभ्या केलेल्या बेशिस्त वाहनाचा त्रास सहन करावा लागतो. अश्या बेशिस्त वाहनधारकांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी तहसीलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना लोणार शहरातील नागरिकांनी केली आहे.
लोणार शहरात तीन चाकी व चार चाकी माल वाहतूक वाहनांनी शहरातील सर्व रस्त्यावर व्याप वाढवला आहे. या उभ्या केलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद होतो व त्या मुळे दुसरे वाहन तिथून निघत नाही. परिणामी अनेक वाहनधारकांचे छोटे मोठे वाद होत असतात. याचा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सुध्दा मानसिक त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील अतिक्रमित फळगाड्या रस्त्याच्या मधोमध लागत असून दिवसातून दोन ते तीन वेळेस फळ गाडी व वाहनधारक यांच्यामध्ये गाडीच्या धक्क्यावरून वादविवाद होतात. वेळप्रसंगी छोट्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन एखाद्या दिवशी जातीय दंगल होऊ शकते या सर्व गोष्टीची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन बेशिस्त वाहनधारकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी अनिल तेजराव मापारी, ऍड भागवत मापारी, रोनक अली सिद्दिकी, ऍड दीपक मापारी, गोपाल मापारी, शाम जारे, बाळासाहेब आखाडे, प्रा. वसंत जनार्दन मापारी, प्रमोद चनखोरे, निखिल मापारी, शेख दादू अमजद खान, श्याम शिंदे, सुरेश बेदमुथा, अभिजीत सानप, शिवा जाधव, गजानन चाटे, प्रकाश अवसरमोल, खाजा भाई गॅरेजवाले, शेख इम्रान शेख नबी, भूषण शेषराव मापारी, दीपक भागवत मापारी, विनायक सोनुले, सुरेश मोरे, कैलास अंभोरे, शिवाजी कोकाटे, सोपान कुलाल, राम मापारी आदी नागरिक उपस्थित होते.