
दिव्यांगांना घरपोच सुविधा देण्याचा मानस – आ. श्वेताताई महाले
MH 28 News Live, चिखली : दिव्यांग व्यक्तीला आणणे आणि नेणे कठीण असते . त्यातच 100 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीला दिव्यांग तपासणी व इतर सुविधा करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते. त्यामुळे किमान 70 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या नागरिकांची घरी जाऊन तपासणी करुन त्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र घरपोच देण्याची तसेच इतर शासकिय योजनांचा लाभ घरपोच सेवा देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग तपासणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिरात त्या बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व 17 सप्टेंबर या वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधीमध्ये राज्य सरकारच्या वतीने ” राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ” सेवा पंधरवाडा म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत चिखली ग्रामीण रुग्णालय येथे भव्य दिव्यांग तपासणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिर संपन्न झाले. शिबिरात 230 दिव्यांगांची झाली तपासणी करण्यात आली.
गावात काम करणाऱ्या आशा सेविका व मदतनीस यांचेकडून गावात दिव्यांग असलेल्या नागरिकांची शोध मोहीम सुरू करण्याची गरज असल्याचे आ. श्वेताताई महाले यांनी सांगितले. प्रत्येक गावात पन्नाशी ओलांडलेल्या अनेक वयोवृद्ध नागरिक अपघात झाल्याने किंवा वयोमान झाल्याने शरीरातील अनेक अवयव काम करत नाही . घरात असणारी वृध्द व्यक्तीचे जर काहीच उत्पन्न नसेल तर ती व्यक्ती काहीच कामाची नाही असे समजून त्यांची मुले त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामूळे त्या व्यक्ती अपंग असूनही त्यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामूळे ते खरे गरजू असतांनाही त्यांना शासकिय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामूळे खऱ्या गरजुंपर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करण्याचे आवाहन आ. महाले यांनी पुढे केले.
या शिबिरामध्ये 62 नेत्र , 98 अस्थिव्यंग, कान,नाक,घसा 50, मानसोपचार 13, इतर 7 अशा 230 विवीध दिव्यांगांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे सर्व कागद पत्रे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधव अगोदर पीडित असतात. निसर्गाने त्यांना अधू केलेले आहे . त्यातच दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळत नाही . चिखली तालुक्यातील दिव्यांगांची प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बुलडाणा येथे जावे लागते. यामुळे त्यांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामूळे यापुढे आता चिखली ग्रामीण रुग्णालयात दर महिन्याला एकदा दिव्यांग तपासणी करणार असल्याचे आ. श्वेताताई महाले यांनी जाहीर केले . त्यासाठी लवकरच महिन्याचा ठराविक दिवस जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष डॉ कुष्णकुमार सपकाळ रुग्ण कल्याण समिती सदस्य बबनराव राऊत आदींची उपस्थिती होती.