
एकाच घरातील तिघांचा खून करणार्यास जन्मठेप व मुलाची हत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल १० वर्षे सश्रम कारावास. जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
MH 28 News Live, मेहकर : जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस. एम. चंदगडे यांनी २१ डिसेंबर बुधवार रोजी सुनावलेल्या निकाला मध्ये जन्मठेप शिक्षा क़ायम. मेहकर तालुक्यातील गांव कासारखेड़ येथे लोखंडी पहारीने वार करून पत्नी व दोन मुलींचा खून केल्याच्या आरोपावरून प्रत्येक खुनासाठी नैसर्गिक जीवन असेपर्यंत जन्मठेप आणि मुलाची हत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल १० वर्षे सश्रम कारावास. अशी शिक्षा मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस. एम. चंदगडे यांनी सुनावली.
१२ मार्च २०१६ रोजी सकाळी २ वाजता मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे हे भीषण हत्याकांड घडल्याने जनमानस प्रचंड हादरून गेले होते. फिर्यादी ने सांगतले होते की, माझा भाऊ समाधान शेषराव अंभोरे याच्या घरात १२ मार्च २०१६ रोजी सकाळी २ वाजता दणदण असा मारण्याचा आवाज आल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी जाऊन पाहिले असता समाधान हा त्याची पत्नी व मुलामुलीला लोखंडी पहारीने मारत असल्याचे दरवाजाच्या खिंडीतून दिसले. दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेंव्हा समाधानची पत्नी मीना ४० वर्षे, मुलगी अश्विनी १५ वर्षे, अंकिता १३ वर्षे, मुलगा गोपाल ६ वर्षे हे जखमी अवस्थेत दिसले, असे जानेफळ पोलिसात फिर्यादी आश्रुबा शेषराव अंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद होते. चारही जखमींना मेहकर येथील मल्टिस्पेशालिटी दवाखान्यात नेण्यात आले. तिथे अश्विनीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरीत तिघा जखमींना औरंगाबाद येथे उपचारार्थ नेण्यात आले असे म्हटले आहे.
औरंगाबाद येथील रुग्णालयात आरोपीची पत्नी मीना,व मुलगी अंकिता यांचा मृत्यू झाला.मुलगा गोपाल वाचला.या भीषण हत्याकांडाप्रकरणी आरोपी समाधान अंभोरे विरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. १६ साक्षीदारांपैकी तपास अधिकारी, डॉक्टर वगळता इतर साक्षीदार
फितूर झाले. सरकार पक्षाचे वकील ऍड.जे.एम. बोदडे यांनी केलेली साक्षीदारांची उलटतपासणी व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी समाधान शेषराव अंभोरे यास त्याची पत्नी मीना, मुली अश्विनी व अंकिता यांच्या प्रत्येक खुनाबद्दल नैसर्गिक जीवन असेपर्यंत जन्मठेप, तसेच मुलगा गोपाल याच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल १० वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड अशी शिक्षा मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस. एम. चंदगडे यांनी (२१ डिसेंबर) रोजी सुनावली.
एकाच घरातील तिघांचा खून झाल्याच्या कासारखेड येथील भीषण घटनेमुळे २०१६ साली प्रचंड खळबळ उडाली होती. समाजमन सुन्न झाले होते. हे हत्याकांड संपूर्ण राज्यात त्यावेळी गाजले होते. आज या हत्याकांड प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात खूप गर्दी झाली होती. विशेष म्हणजे तीनही खुनासाठी प्रत्येक खून करण्याच्या अपराधाबद्दल न्यायाधीश चंदगडे यांनी आरोपीस नैसर्गिक जीवन असेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, हे या निकालाचे वैशिष्ट्य आहे.