कॅनव्हास आणि इतर कविता” माणुसकीचा अनुबंध साधते – प्रा. डाॅ. कि. वा. वाघ
MH 28 News Live, चिखली : येथील प्रसिद्ध चित्रकार व कवी रवींद्र खानंदे यांच्या ” कॅनव्हास आणि इतर कविता ” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन बुलढाणा येथील प्रगती वाचनालयामध्ये रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आले. चित्रपट गीतकार प्रा. डाॅ. गोविंद गायकी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शब्दमळा फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्य कुटे म्हणाले की, सांप्रत धकाधकीच्या अशाश्वत वर्तमानात प्रदीर्घ काळ काव्य लेखन करणारे कवी रवींद्र खानंदे यांनी कवीतेसह चित्रकलेच्या क्षेत्रात आपला अवकाश सतत विस्तारत ठेवला आहे.
भाष्यकर्ते प्रा. डॉ. कि. वा. वाघ यांनी प्रस्तुत काव्य संग्रहाची ससंदर्भ उकल केली. प्रा. रवींद्र साळवे यांनी संग्रहातील कवितांवर अभ्यासपुर्ण मार्मिक मत मांडले. कवी मांगीलाल राठोड यांनी स्नेहाच्या ऋणानुबंधातून प्रभावी विचार प्रतिपादित केले. अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. गोविंद गायकी यांनी कवितेची पुर्वपिठीका नमुद करीत आपले स्वानुभव व्यक्त केले.
यावेळी विशेष उपस्थितीमध्ये “मुनादी”कार मांगीलाल राठोड, मा. प्रा. डॉ. कि. वा. वाघ (मा.अध्यक्ष-जिल्हा ग्रंथालय संघ, बुलढाणा), प्रा. रवींद्र साळवे यांच्यासह जेष्ठ कवी सर्जेराव चव्हाण, शाहीना पठाण, श्रीमती विजया काकडे, वैशाली तायडे,अनिता कापरे, सुवर्णा कुळकर्णी (बिनीवाले), संदीप राऊत, पंजाबराव गायकवाड, नंदकिशोर अढाऊ, नाट्यकर्मी विनय शुक्ल, रविकिरण टाकळकर यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार नजीम खान यांनी तर आभार रंजना जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवहरी मिसाळ, भगवान आरसोडे, वंदना लकडे, सुहास कुलकर्णी, अविनाश असोलकर, नितीन शेळके, देविदास दळवी, सलील खानंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी चिखली सह बुलढाणा येथील काव्य रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button