
गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
MH 28 News Live, चिखली : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक १९ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत गणेश जयंती निमित्त जुने गाव मधील श्री गणपती संस्थानमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात १९ जानेवारी बुधवारला रात्री साडेसात वाजता ह भ प निवृत्ती महाराज शिरसोली यांचे किर्तन होईल, शुक्रवार २० जानेवारीला रात्री साडेसात वाजता संतोष तोत्रे जीवन विद्या मिशन शाखा पुणे यांचे देवा तूचि गणेशु या विषयावर प्रवचन होणार आहे. शनिवार २१ जानेवारीला रात्री साडेसात वाजता आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन मंदिर औरंगाबादचे डॉ जय हनुमानदास यांचे प्रवचन, रविवार २२ जानेवारीला दुपारी बारा ते चार या वेळामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री साडेसात वाजता नुपूर नृत्य निकेतन नागपूर द्वारा आयोजित सतीश बगडे व संच प्रस्तुत वैकुंठ नायका भक्ती नृत्य सादर करण्यात येईल. सोमवार २३ जानेवारीला मराठी संगीत विशारद आशाताई खोकले अकोला यांचे सद्गुरु महिमा या विषयावर प्रवचन व २४ जानेवारी मंगळवार रोजी युवा कीर्तनकार ह भ प अंकुश महाराज राजपूत श्री रंगनाथ महाराज संस्थान नाव्हा यांचे किर्तन पार पडेल. बुधवार २५ जानेवारीला सकाळी सात वाजता श्री गणपती अथर्वशीर्षाची सामूहिक आवर्तने, साडेआठ वाजता महाआरती तसेच सकाळी दहा वाजता शोभायात्रा काढण्यात येईल. दुपारी दोन वाजता पुष्पपुष्टी व गुलालाचा कार्यक्रम तसेच काल्याचे किर्तन हभप मोहन सावजी महाराज हे करतील. दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम राहील. सायंकाळी साडेसात वाजता फटाक्याची आतिशबाजी तसेच रात्री साडेआठ वाजता भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणपती संस्थांनतर्फे करण्यात आले आहे.