
सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात वादळी पावसाचे थैमान; गारपीट, वीज कोसळून दुचाकीस्वार ठार
MH 28 News Live / सिंदखेडराजा : निसर्गाच्या लहरीपणाने पुन्हा एकदा भीषण रूप धारण करत सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी रात्री झालेल्या वादळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक आकाशात काळे ढग दाटून आल्यानंतर काही क्षणांतच मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली. जालना जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोरीएवढ्या आकाराच्या गारा पडल्याची माहिती समोर आली आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, पिंपरी आंधळे तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये वादळाने मोठा कहर केला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली तर काही घरांची पडझड झाली. गोठ्यांचेही नुकसान झाले असून अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते अडथळाग्रस्त झाले. रस्त्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
वादळी वाऱ्याचा फटका वीज यंत्रणेलाही बसला. देऊळगाव राजा शहरातील अनेक भागांमध्ये वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. रात्रीच्या वेळी अचानक अंधार पसरल्याने नागरिकांचे हाल झाले. महावितरण कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गारपिटीमुळे फळबागा व पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

दुसरीकडे सिंदखेडराजा तालुक्यात निसर्गाच्या या तांडवाने जीवही घेतला. राहेरी बुद्रुक येथे सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वीज कोसळल्याने दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. लक्ष्मीकांत भगवान देशमुख (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून बालू रामलाल मगर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



