
नांदूरा अर्बनच्या ९ संचालकांचा जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा. अध्यक्ष पांडव यांच्यावर अनेक आरोप
MH 28 News Live, नांदुरा : येथील नांदुरा अर्बन को ऑप बँकेच्या ९ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सामूहीक राजीनामा सादर केला आहे. त्यांनी सादर केलेल्या राजीनामा पत्रात बँकेचे अध्यक्ष अरुण ह. पांडव यांच्यावर अनेक आरोप करत त्यांच्यामुळेच राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
सौ. सुमन राकेश मिहानी, प्रल्हाद हरीभाऊ भारंबे, गणेश सुरजमल नव्याणी, अनुप प्रभाकर कोलते, सतराम माधवलाल हरगुणानी, डॉ. प्रशांत महादेव बोरसे, सौ. आशा प्रकाश खंडेलवाल, भरतकुमार मोहनलाल भुतडा व चंपालाल राधाकिसन झंवर या संचालकांनी सामूहीक राजीनामा दिला असून त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांना सादर केलेल्या सामूहिक राजीनामा पत्रात नमूद आहे की, दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता दि. नांदुरा अर्बन को ऑप बैंक लि. नांदुराच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा आयोजीत करण्यात आली होती. सदर सभेचे कामकाज सुरु असतांना व ह्या संदर्भात चर्चा करीत असतांना आणि विशेष सदर सभेमध्ये बँकेच्या महिला संचालक उपस्थित असतांना बँकेचे अध्यक्ष अरुण ह. पांडव यांनी बँकेचे संचालक अनुप प्रभाकर कोलते यांना शिवीगाळ केली, तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनाक्रम अत्यंत दुर्देवी तसेच सहकारचे तत्वावर काळीमा फासणारे असून अध्यक्ष पदाला अशोभनीय आहे. याआधी सुध्दा अध्यक्षांनी बरेचदा बँकेचे संचालक आणि बँकेचे कर्मचारी वर्गासोबत अश्याच प्रकारचे अशोभनीय व्यवहार केलेले असून वेळोवेळी त्यास संमज देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी अध्यक्ष पदाची गरीमा न ठेवल्यामुळे आणि आज झालेल्या प्रकाराचे गांभिर्य लक्षात घेता अध्यक्ष या पदावर राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार राहीलेला नाही, आम्हा सर्व संचालकांना त्यांच्या अध्यक्ष पदाच्या नेतृत्वावर विश्वास सुध्दा राहिलेला नाही व त्यांच्या नेतृत्वात संचालक म्हणून काम करण्याची इच्छा नाही त्यामुळे आम्ही सर्व संचालक आमच्या संचालक पदाचा राजीनामा देत आहोत. असे सदर पत्रात नमूद आहे. याबाबत अध्यक्ष पांडव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.