
सिनेस्टाईल पाठलाग… आणि अखेरीस आय टी आय रॅगिंग प्रकरणातील पाचवा आरोपी पोलिसांनी पकडला !
MH 28 News Live, लोणार : येथील आय टी आय. मध्ये शिक्षण घेणारा १९ वर्षीय विद्यार्थी कैलास समाधान गायकवाड याने कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षक व वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केलेल्या रॅगिंग आणि शिक्षकाच्या शिवीगाळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी अखेरच्या आरोपीचा पळून जात असताना सिनेस्टाइल पाठलाग करत लोणार पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या त्या शिक्षक आरोपीची लोणार न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
मृतक विद्यार्थ्यांच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल सुद्धा केला आहे. आठ आरोपीपैकी चार आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते तर उर्वरित तीन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करत समज पत्र देण्यात आली. वयस्क आरोपीपैकी आय टी आय कॉलेजचे शिक्षक अनिल विश्वनाथ काळे हे घटना घडल्यापासून फरार झाले होते. सदर आरोपी अटक न झाल्याने मृतक विद्यार्थ्यांचे नातेवाईक वारंवार लोणार पोलीस स्टेशनला येऊन आरोपी ला अद्याप का अटक करण्यात आली नाही याबद्दल वारंवार विचारत होते. फरार आरोपीचे अटकेबाबत पोलीस प्रशासनावर दबाव वाढत होता. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी आपल्या कर्मचाऱ्यासहित गोपनीय खबऱ्यांमार्फत आरोपीच्या ठावठिकाणा शोधन्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घेतली. अशाच तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक राजपूत यांना २४ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान आपल्या गोपनीय सूत्राकडून आरोपी बाबत निश्चित माहिती मिळाली. क्षणाचा विलंब न लावता त्यांनी आपले सहकारी पोलीस कर्मचारी पो. का. रवींद्र बोरे, कृष्णा निकम, अनिल शिंदे, विशाल धोंडगे यांना आरोपी अटक करण्याकरता आदेशित केले. चिंचोली सांगळे गावाजवळील पारडा दराडे रोडवरील एका शेताच्या कोठ्यामध्ये. आरोपी दबा धरून बसला होता मात्र त्याला पोलिसांची चाहूल लागतात त्याने तिथून पळ काढला, रात्रीची वेळ असल्या कारणाने तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला. ही बाब पोलीस कर्मचाऱ्यांनी राजपूत यांना सांगितली. त्यांनी आरोपी कुठे पळून जाऊ शकतो याबाबत पक्का अंदाज वर्तवत पोलीस कर्मचाऱ्यांना शेगाव – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या देऊळगाव कुंडपाळ फाट्याजवळ अंधारात आरोपीवर पाळत ठेवत दबा धरून बसण्यास सांगितले.
अखेर पोलीस निरीक्षक राजपूत यांचा अंदाज खरा ठरला, आरोपी हा एका चार चाकी वाहनात गाडीतील लाईट बंद करत व काचा लावून घेत बाहेरगावी फरार होण्याच्या तयारीत होता. गाडी फाट्यावर येतात सिनेस्टाईल पाठलाग करत गाडीतील आरोपी आय टी आय शिक्षक अनिल कुमार विश्वनाथ काळे याच्या मुसक्या आवळत पोलिसांनी अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता दिनांक 27 जानेवारी रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केल्याने मृतक विद्यार्थ्यांच्या नातेवाईकाचा रोष पोलीस प्रशासनावर कमी झाला असून या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.