
गायगाव बु ।। ची पाणी समस्या सोडवा या मागणीसाठी प्रहार संघटनेचे केले भांडे बजाव आंदोलन
MH 28 News Live, शेगाव: येथून जवळच असलेल्या शेगाव खामगाव रोडवरील गायगाव बुद्रुक येथील पाणी समस्या सोडवा या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने शेगाव पंचायत समिती कार्यालयात भांडे बजाव आंदोलन करण्यात आले.
शेगाव शहर व परिसरात मागील महिन्याभरापासून प्रखर ऊन तापत आहे, अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात गायगाववासीयांना कामधंदे सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे; त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर ही विपरीत परिणाम होत आहे. गावामध्ये जी हातपंप आहेत ती सर्व हातपंप नादुरुस्त असल्याने बंद आहेत. शेगाव पंचायत समिती प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन गायगाव वासियांना पाणी समस्येपासून मुक्त करावे याकरिता त्वरित उपाययोजना करावी व गायगाव येथील बंद असलेले सर्व हातपंप सुरू करावे या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांच्या समवेत प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने निलेश घोंगे यांच्या नेतृत्वाखाली शेगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये आज बारा एप्रिल रोजी धडक देण्यात आली व त्या ठिकाणी झोपलेल्या पंचायत समिती प्रशासनाला जागे करण्यासाठी भांडे बजाव आंदोलन करण्यात आले. पंचायत समिती प्रशासनाने त्वरित पाणी समस्या दूर करणे बाबत योग्य ती कारवाई न केल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा निलेश घुगे यांनी दिला. यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती शेगाव यांना एक निवेदन देण्यात आले या निवेदनावर गजानन आडमकार, दीपक ढगे, नवलसिंग पवार यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.



