♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

त्याचा गुन्हा एवढाच होता की त्याने शिक्षकाला प्रश्न विचारला… दहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण; शिक्षकावर गंभीर आरोप

MH 28 News Live / बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारल्याच्या कारणावरून शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तन्मय खंडागळे या विद्यार्थ्याला शिक्षक राहुल जाधव यांनी मारहाण केल्याचा आरोप असून, या घटनेत विद्यार्थ्याच्या पाठीवर लाल चट्टे उमटले असून डोक्यालाही मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी तन्मयवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय हा जिजामाता विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. वर्गात शिक्षक राहुल जाधव यांना प्रश्न विचारल्याच्या कारणावरून दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत तन्मय जखमी झाला. मात्र, त्यानंतर त्याला तत्काळ घरी न पाठवता सुमारे चार वाजता घरी पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

घरी पोहोचल्यानंतर तन्मयने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्याच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा असून डोक्यालाही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

‘घरी सांगू नको’ असा दम दिल्याचा आरोप

या घटनेला अधिक गंभीर वळण देणारा आरोप विद्यार्थ्याकडून करण्यात आला आहे. मारहाणीनंतर तसेच शाळेतील काही शिक्षकांनी घडलेला प्रकार घरी कोणाला सांगू नये, अशा स्वरूपाचा दम दिल्याचे तन्मयचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाची केवळ मारहाणीपुरती चौकशी न करता विद्यार्थ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला का, याचीही चौकशी करण्याची मागणी पालकांकडून होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी-पालकांमध्ये संताप

शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भीतीमुक्त वातावरण देणारी जागा असणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्याने प्रश्न विचारणे हा शिक्षण प्रक्रियेतील स्वाभाविक आणि महत्त्वाचा भाग असताना, त्यासाठी शारीरिक मारहाण झाल्याचा आरोप गंभीर आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. विद्यार्थ्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129