पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा झाली सज्ज; उद्या २६२ केंद्रांवर मतदान
MH 28 News Live , बुलढाणा : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे मतदान सोमवारी (दि.३०) सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडणार आहे. निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून नेमानी गोडाऊन, बडनेरा रोड येथे करण्यात येणार आहे.
अमरावती जिल्ह्यात ७५ मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान अधिकारी व संबंधितांचे ८५ चमू तयार करण्यात आले आहेत. त्यातील १० चमू राखीव ठेवण्यात येणार आहेत.
अमरावती विभागातील मतदारांची संख्या
अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभागात १ लाख ३४ हजार १४ पुरूष, ७२ हजार १४१ महिला व इतर १७ असे एकुण २ लाख ६ हजार १७२ मतदारांची नोंदणी झालेली आहे.
अकोला जिल्ह्यात ३१ हजार ७६९ पुरूष, १८ हजार ८३१ महिला व ६ इतर असे एकूण ५० हजार ६०६, तसेच बुलडाणा जिल्ह्यात २७ हजार १६८ पुरूष, १० हजार ७२६ महिला (इतर शून्य) असे एकूण ३७ हजार ८९४ मतदार नोंदणी आहे. वाशिम जिल्ह्यात १३ हजार ३३३ पुरूष, ४ हजार ७१५ महिला व २ इतर असे एकूण १८ हजार ५० आणि यवतमाळ जिल्ह्यात २३ हजार ७८५ पुरूष, ११ हजार ४९३ महिला (इतर शून्य) एकूण ३५ हजार २७८ मतदारांची नोंदणी आहे.
मतदान केंद्रे
विभागात २६२ मतदान केंद्रे असतील. त्यात अमरावती जिल्ह्यात ७५, अकोला जिल्ह्यात ६१, बुलडाणा जिल्ह्यात ५२, वाशिम जिल्ह्यात २६ व यवतमाळ जिल्ह्यात ४८ केंद्रे असतील. निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिका-यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून २८८, मतदान अधिकारी म्हणून १ हजार १५३ व सूक्ष्म निरीक्षक म्हणून २८९ अधिकारी व कर्मचा-यांना जबाबदारी देण्यात येत आहे.
पदवीधर निवडणुकीचे काम सुरळीत पार पडण्यासाठी विविध कक्ष व नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी ceoelection.maharashtra.gov.in./gtsearch/ ही लिंक विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button