जिल्ह्यात होणार कॉपीमुक्त परीक्षा; जिल्हा प्रशासनाचा निर्धार
MH 28 News Live, बुलडाणा : येत्या महिन्यात दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा भयमुक्त वातावरणात होण्यासाठी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिली.
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुकुंद प्रकाश आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात 113 केंद्रावरून 32 हजार 183 विद्यार्थी बारावी, तर 153 केंद्रांवरून 39 हजार 684 विद्यार्थी दहावीची परीक्षा देतील. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. यात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमध्ये भरारी आणि बैठे पथकांची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एक भरारी पथक, तर प्रत्येक केंद्रासाठी एक बैठे पथक राहणार आहे. बैठे पथकात विविध कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे. हे पथक प्रामुख्याने केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यास मदत करणार आहे.
परीक्षा केंद्रावर केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात बंदी आदेश लागू करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रामध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी त्यांच्या जागी उपस्थित राहावे, लागणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षा सुरू होण्याच्या वेळीच प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि विजेचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृहाची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी पालक, शिक्षक, संस्थाचालक तसेच शासकीय, अधिकारी कर्मचारी यांच्यात जाणीव जागृती करण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button