
मराठी स्वाक्षरी अभियान राबवून मनसेच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा
MH 28 News Live, चिखली : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला आहे. २७ फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जात असून स्थानिक मेहकर-जालना रोडवरील मनसे कार्यालयात हा दिन मराठीमध्ये स्वाक्षरी करीत साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ता. २७ रोजी मेहकर – जालना रोडवरील मनसे कार्यालयासमोर डिजीटल बोर्ड लावत त्यावर मराठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी या बोर्डवर मराठीमध्ये आपल्या स्वाक्षर्या करीत मराठी भाषेवरील आपले अभिजात प्रेम व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, चिखली शहर अध्यक्ष नारायण देशमुख, मन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मन शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, उपतालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, तालुका सचिव प्रवीण देशमुख, उपशहराध्यक्ष रवी वानखेडे, मनवि सेना तालुकाध्यक्ष स्वप्निल आसोले, प्रवीण देशमुख ता.सचिव यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
मराठी भाषेचे संवर्धन होणे गरजेचे – बरबडे
महाराष्ट्रातील नागरिकांची मराठी ही अभिजात भाषा असून मराठी भाषेवरील नागरिकांचे प्रेम अधिक वृद्धिंगत व्हावे तसेच माय मराठीचे जतन, संवर्धन व्हावे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले आहे. या उपक्रमाला अधिक व्यापक स्तरावर राबविण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून भविष्यात त्याकरिता पाऊले निश्चित उचलण्यात येतील असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी या वेळी बोलताना केले.



