
खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी शासनाने बाँण्ड काढल्यास ‘ फेडरेशन ‘ गुंतवणूक करण्यास तयार – काकासाहेब कोयटे
MH 28 News Live, चिखली : विदर्भ आणि मराठवाड्यातील बुलढाणा व जालना जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची क्षमता असलेल्या खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या वाट्याचा ५० टक्के निधी लवकरात लवकर मंजूर करावा; या बहुप्रतिक्षीत प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने शासनाने बाँण्ड विक्रीला काढले तर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या बँण्डमध्ये निश्चितच गुंतवणूक करेल असे आश्वासन फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी दिले. मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी रेल्वे लोकआंदोलन समितीतर्फे यासंदर्भात कोयटे यांना निवेदन सादर करण्यात आले तेव्हा ते बोलत होते.
रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने मागील १७ वर्षांपासून खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे हे चिखली भेटीवर आले असता फेडरेशनचे संचालक सुदर्शन भालेराव यांच्या निवासस्थानी समितीच्या वतीने प्राचार्य डॉ. किशोर वळसे व रेणुकादास मुळे यांनी कोयटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. खामगाव – जालना रेल्वेमार्गाच्या निर्मितीकरता राज्य शासनाने बाँण्ड जारी केल्यास फेडरेशनच्या माध्यमातून ते खरेदी करण्याची विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.
या संदर्भात बोलताना खामगाव – जालना रेल्वेमार्ग होणे विकासाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असल्याचे मत काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केले तसेच राज्य शासनाने या रेल्वेमार्गासाठी आपला ५० टक्के वाटा त्वरीत मंजूर करून तसे पत्र केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठवावे अशी मागणी देखील त्यांनी केली. या रेल्वेमार्गाला निधी उभारण्यासाठी राज्य शासनाने बाँण्ड काढल्यास ते बाँण्ड खरेदी करून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यामध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे ठोस आश्वासन काकासाहेब कोयटे यांनी समितीच्या सदस्यांशी बोलताना दिले. पतसंस्था फेडरेशनचे संचालक सुदर्शन भालेराव, बालाजी अर्बनचे अध्यक्ष अँड. मंगेश व्यवहारे व चिखली अर्बन बँकेच्या संचालिका सुनीता भालेराव या प्रसंगी उपस्थित होत्या.