परीक्षा मंडळाचा सावळा गोंधळ… बारावीच्या गणिताचा पेपर फुटलाच नाही ! तो पुन्हा घेणार नाही ; एकीकडे मंडळाचे स्पष्टीकरण आणि दुसरीकडे झाला गुन्हा दाखल
MH 28 News Live, बुलढाणा : यवतमाळ येथे इंग्रजीचा पेपर फुटल्याची घटना ताजी असतानाच आता बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजामध्ये बारावी गणिताचा पेपर फुटल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे.
तथापि, हा पेपर फुटलेला नसून, तो पुन्हा घेतला जाणार नाही. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा खुलासा राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केला आहे. दरम्यान, विधिमंडळातही या विषयाचे तीव्र पडसाद उमटले.
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. यादरम्यान कॉपीसारखे अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. असे असतानाही परीक्षेदरम्यान गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तसेच हिंदीच्या पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. शिवाय, इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणार्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
गणिताचा पेपर पुन्हा नाही !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यात दहावी-बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध झाली. परंतु, संबंधित पेपर फुटलेला नाही. त्यामुळे तो पुन्हा होणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिले आहे.
ओक यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, बारावी परीक्षेतील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध झाली आहे. संबंधित प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १० : ३० वाजेनंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १० : ३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दुपारी २ : ३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही.
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
संबंधित घटनेबाबत सिंदखेडराजा पोलिस ठाण्याला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्वसंबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.
विधिमंडळातही तीव्र पडसाद
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात हा विषय उपस्थित करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाकडे सरकारचे लक्ष वेधले. या पेपरफुटीला जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सगळी माहिती घेऊन यासंदर्भात उचित कारवाई केली जाईल, असा निर्वाळा दिला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button