मलकापुरात काँग्रेस नेत्याकडून सव्वा दोन वर्षांपासून वीज चोरी, भरारी पथकाकडून १० लाख ४७ हजार ९२२ रुपयांचा दंड
MH 28 News Live, मलकापूर : एका मोठ्या काँग्रेस नेत्याकडून आपल्या रुग्णालयात आणि आपल्या घरात वीज चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. अरविंद कोलते असं या काँग्रेस नेत्याचं नाव आहे. विद्युत मीटरमध्ये छेडछाड करुन तब्बल सव्वा दोन वर्ष वीज चोरी सुरु होती. या प्रकरणी बुलढाणा विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून १० लाख ४७ हजार ९२२ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सव्वा दोन वर्षात तब्बल ६० हजार ९७८ युनिटची चोरी
डॉ. अरविंद कोलते यांच्या रुग्णालयात आणि घरात वीज चोरी होत असल्याची माहिती विद्युत वितरणला मिळाली. त्यानुसार बुलढाणा विद्युत वितरणाच्या भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात असलेल्या विद्युत मीटरची तपासणी केली असता विद्युत मीटरमध्ये छेडछाड केल्याचे समोर आलं आहे. यावेळी मीटरची तपासणी करुन गेल्या सव्वा दोन वर्षांपासून ही वीज चोरी सुरु असल्याचं उघड झालं. या सव्वा दोन वर्षात तब्बल ६० हजार ९७८ युनिटची चोरी केल्याचं भरारी पथकाच्या निदर्शनास आलं. त्यामुळे विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून या काँग्रेसच्या नेत्याला १० लाख ४७ हजार ९२२ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारवाई दरम्यान भरारी पथकाने या काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात लावलेले विद्युत मीटर जप्त केले आहे. विद्युत वितरणाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मलकापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. कोलते यांनी तीन टर्म मलकापूर विधानसभेमध्ये निवडणूक सुद्धा लढवलेली आहे. एकदा अपक्ष तर दोनदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर डॉ. कोलतेंनी निवडणूक लढवलेली आहे. शिवाय निवडणूक लागण्याच्या आधी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डॉ. अरविंद कोलते हे मुख्य प्रशासक म्हणून कारभार पाहत होते. यामुळेच काँग्रेस नेते डॉ. अरविंद कोलते यांनी वीज चोरी केल्याने ते चर्चेत आले आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button