
गाडे बंधू आणि येळवंडेला २४ एप्रिलपर्यंत पीसीआर
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांनी गंडा घालणारे गाडे बंधू व त्यांचा साथीदार येळवंडे संतोष गाडे, अंकुश गाडे आणि सुदर्शन येळवंडे या तिघांना आज, १८ रोजी आर्थिक गुन्हे शाखेने मलकापूर येथून अटक केली. त्यानंतर त्यांना चिखली पोलिसांकडे सोपवले व तेथून तालुका न्यायालयात हजर केले असता तिन्ही आरोपींना २४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चिखली तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसह अडत व्यापारी व बँकांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या संतोष गाडे, अंकुश गाडे आणि सुदर्शन येळवंडे यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात १५ एप्रिलला गुन्हा नोंदवण्यात आला होता. तत्पूर्वी त्यांनी बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयात नादारीचा अर्ज सादर केला होता. दरम्यान शेतकऱ्यांना वाढता रोष लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने वेगाने तपास करत आज सकाळी गाडे बंधू आणि येळवंडे यांना मलकापुरातून ताब्यात घेतले.
चिखली येथील तालुका न्यायालयात त्यांना हजार केले असता न्यायालयाने तिघांची रवानगी २४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत केली. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तिघाही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यासाठी बुलढाणा येथे नेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
कोट्यवधी रुपयांनी फसवणूक या व्यापाऱ्यांनी केली होती. स्वतःला नादार घोषित करण्याच्या हालचाली देखील त्यांनी चालवल्या आहेत. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, एसपी यांच्या भेटी घेत तक्रारी दिल्या होत्या. १५ एप्रिलला चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांवर वाढता दबाव असल्याने पोलिसांनी विविध पथके गठित केली होती…