
रोजगाराची संधी… टपाल जीवन विमा योजनेसाठी एजंट भरती. इच्छुकांनी अर्ज करावे
MH 28 News Live, बुलडाणा : महाराष्ट्र आणि गोवा राज्यात टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह दि. 10 मे 2023 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत डाकघर कार्यालयात उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
एजंटसाठी वय वर्षे 18 ते 50 दरम्यान असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी, बेरोजगारीत किंवा स्वयम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतर उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञानाच्या आधारावर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा किसान विकास पत्रच्या स्वरुपात पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल.
प्रशिक्षण पूर्ततेनंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कायम परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल. नियुक्तीनंतर आयआरडीएची परवाना परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहिल. दहावी किंवा बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड झेरॉक्स, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र अर्जासह असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन दिले जाईल. याबाबत अधिक माहितीसाठी डाक कार्यालयास संपर्क साधावा किंवा maharashtrapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.