
हॉटेल मालकाने उधारी मागितली. मात्र, त्या पाच जणांनी केले भलतेच कृत्य…
MH 28 News Live, बुलढाणा : उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल मालकाला मारहाण करून त्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अनिल शेषराव पैठणे असे पीडित हॉटेल मालकाचे नाव आहे. रवींद्र भास्करराव पाटील, यश रवींद्र पाटील, प्रेम अरुण पाटील, संदीप मनोहर जाधव आणि सोपान जाधव अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कोलवड येथील अनिल शेषराव पैठणे यांचे बुलढाणा-धाड मार्गावर हॉटेल आणि बिअर बार आहे. त्याठिकाणी रवींद्र भास्करराव पाटील, यश रवींद्र पाटील, प्रेम अरुण पाटील, संदीप मनोहर जाधव आणि सोपान जाधव यांच्याकडे हॉटेल मालकाने मागील उधारीचे पैसे मागितले. यावेळी आरोपींनी हुज्जत घालत लोखंडी पाईपने मारहाण सुरू केली.
दरम्यान, फिर्यादीची पत्नी आणि मुलगा भांडण सोडण्यासाठी आले असता आरोपींनी त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपी फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.